मुंबई : विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे, यासाठी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी (दि.20 नोव्हेंबरला) मतदान होणार आहे. मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. या कारणामुळे विद्यार्थ्यांना मतदानापासूनच वंचित राहावे लागले असते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती.
विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचे पत्र युवा सेनेने (शिंदे गट) विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा रौंदळे यांना देण्यात आले होते. त्यानुसार, विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरीता मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
मुंबई विद्यापीठाच्या दि. 19 नोव्हेंबर ला होणा-या परीक्षा दि. 30 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तर दि.20 नोव्हेंबरच्या परीक्षा दि. 07 डिसेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत.