मुळशी : मुळशीतील खांबोली येथील बंधाऱ्यात बुडून पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राज संभाजी पाटील (वय-२२ वर्षे, सध्या रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन, पुणे. मूळ गाव म्हळसर, ता. शिंदखेडा, धुळे) व ओजस आनंदा कटापुरकर (वय-२२ रा. शरयू नगर, प्राधिकरण, निगडी) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असलेले एकूण नऊ विद्यार्थी खांबोली परिसरातील बंधाऱ्यावर फिरायला आले होते. बंधाऱ्यातील पाणी आलेल्या शेताच्या बांधावरून सर्वजण चालत होते. या बांधालगत एक मोठा खड्डा होता. अंदाज न लागल्याने या खड्यात पाच जण पाय घसरून पडले.
दरम्यान, खड्ड्यात पडलेल्यांपैकी तीन जणांना एकमेकांनी बाहेर काढले. मात्र दोघे जण तेथील पाण्यात बुडाले. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघेही बी. एस्सी. च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. अग्रिशमन दलाच्या जवानांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. दोन्हीं विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी पौड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मृत्यू झालेले दोघेजण विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांना एकुलते एक होते. राज पाटील याचे मूळ गाव म्हळसर असून, त्याचे आई वडील सध्या अमळनेर येथे राहतात. राज हा एकुलता एक असल्यामुळे पाटील कुटुंबावर तसेच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओजस कटापुरकर हा सुद्धा त्यांच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्याही कुटुंब व नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.