पुणे : पुण्यात प्रसिद्ध ब्रिटिश गायक ॲलन वॉकर यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर १८ ऑक्टोबर रोजी लाइव्ह कॉन्सर्टमध्ये घडली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून हे मोबाईल चोरणाऱ्या मुंबई तसेच हैदराबादमधील चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
सय्यद महंमद इद्रीस शेख (वय-२१, रा. मुंबई), अखिल व्यंकटरमना गोदावरी (वय-२४ रा. हैदराबाद), लोकेश हनुमंत पुजारी (वय-३१, रा. मुंबई), पप्पू भागीरथी वैश्य (वय-२४ रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. ब्रिटिश गायक ॲलन वॉकर लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतरही शेख, गोदावरी, पुजारी, वैश्य यांनी गर्दीत प्रेक्षकांकडील मोबाइल चोरले आहेत. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांकडील ३६ मोबाईल चोरल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गर्दीत मोबाईल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. संशय आल्याने पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींची कसुन चौकशी केली असता, त्यांच्याकडून १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन ते तीन साथीदारांचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.