प्रदीप रासकर / निमगाव भोगी : निमोणे (ता. शिरुर) येथे घराशेजारी मोकळ्या जागेत कार लावल्याच्या वादातून एका व्यक्तीसह पाच महिलांनी घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देविदास राधुजी पोटे (वय-५६ वर्षे रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी किशोर बाबुराव पतके, पूजा किशोर पतके, सानिका किशोर पतके, सविता जगदाळे, सविता संजय कदम, लीलाबाई रावसाहेब मोतीमोड (सर्व रा. निमोणे, ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे येथील देविदास पोटे हे घरात असताना शेजारील किशोर पतके यांसह काही महिला देविदास यांच्या घरात आल्या. त्यांनी देविदास यांना दमदाटी करत किशोर यांनी तुझ्या मुलाला सांग तो आमच्या घराच्या शेजारील मोकळ्या जागेत गाडी लावतोय. येथे गाडी लावायची नाही नाहीतर सोडणार नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करु लागले.
तसेच तुमचा मुलगा वकील असला तरी माझा जावई आत्ताच जेलमधून बाहेर आला आहे. त्याला संपवायला वेळ लागणार नाही. यावेळी सविता जगदाळे यांनी तुमचा मुलगा माझ्या दारू विक्रीबाबत नेहमी पोलिसांत तक्रार करतो, त्याला सांगा नाहीतर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू, असे म्हणून सर्वांनी देविदास यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत आहेत.