पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालयात एका प्राध्यापकाने शिकाऊ महिला डॉक्टरासमोर अश्लील शेरेबाजी, तसेच गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात विशाखा समितीच्या अहवालानंतर अखेर संबंधित प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
त्या प्राध्यापकाची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. डॉ. बालाजी दत्तू धायगुडे असे त्या निलंबित केलेल्या प्राध्यापक व सर्वसाधारण शल्यचिकित्सकाचे नाव आहे.
वायसीएम रुग्णालयामध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तेथे शिकाऊ महिला डॉक्टरांसोबत प्राध्यापक व विभागप्रमुख असलेल्या एका बरिष्ठ डॉक्टरने गैरवर्तन केल्याची वाब सोशल मिडियावरील एका पोस्टवरून पुढे आली होती. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर तातडीने डॉ. धायगुडे यांच्याकडील कामकाज काढण्यात आले. तसेच, मध्यवर्ती महिला तक्रार निवारण (विशाखा) समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
चौकशी करताना विशाखा समितीने आजी व माजी विद्यार्थिनीने पीजी इन्स्टिट्यूट यांनी दिलेल्या प्रत्यक्ष जबाब नोंदविले. डॉ. धायगुडे पदाचा गैरवापर करून भीतीदायक वातावरण, असभ्य, अर्वाच्च, लजास्स्पद, अपमानास्पद, शारीरिक ठेवणीबाबत करणे, दारू पिण्यास व नृत्य करण्यास सक्ती करणे, महिलांच्या शरीराकडे लज्जा आक्षेपास टिप्पणी उत्पन होईल असे बघणे, अशा प्रकारचे गैरवर्तणूक करत होते. यावरून त्यांचा विकृत स्वरुपाचा दृष्टिकोन असल्याचे विशाखा समितीने अहवालात नमूद केले आहे.
समितीने शिकाऊ महिला डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचा निष्कर्ष आपल्या अहवालात मांडला. यासह समितीने संबंधिताविरुध्द कठोर कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानुसार, आयुक्त शेखर यांनी या प्रकरणात गंभीर गैरवर्तन, कार्यालयीन शिस्त व नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत डॉ. धायगुडे यांचे सेवानिलंबन केले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.