पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भावी पत्नीशी फोनवर बोलतो, याचा राग मनात धरुन वकिलाने तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून डोक्यात हेल्मेट जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना मोशीमधील बोर्हाडे वस्तीतील फिर्यादीच्या घराच्या पार्किंगमध्ये रविवारी (दि. १३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सुदर्शन बाबुराव काळवे (वय-३३, रा. गीतसिद्धी अपार्टमेंट, मोतेरे हाऊस चौक, बोर्हाडे वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल भिमराव पारवे (वय ३४, रा. दापोडी गावठाण) या वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वकील असून त्याचा विवाह ठरला आहे. त्याच्या भावी पत्नीशी फिर्यादी सुदर्शन काळवे हा फोनवर बोलत असतो, याचा विशाल पारवे याला राग होता. याच रागातून विशाल पारवे हा रविवारी रात्री सुदर्शन काळवे याच्या घरी गेला. त्याला खाली पार्किंगमध्ये बोलावून जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली.
तसेच पारवे याने त्याला शिवीगाळ करुन “मी वकिल आहे. तुला कशात तरी अडकवतो,” अशी धमकी दिली. एवढच नाही तर फिर्यादी यांच्या डोळ्यात चटणी टाकून हेल्मेटने डोक्यात बेदम मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.