दिपक खिलारे
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.२९) इंदापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदन छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने इंदापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना देण्यात आले आहे.
यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, गणेश नागपुरे, समद सय्यद, विनोद शिंदे, साजन ढावरे, आझाद सय्यद, सलमान बागवान, हनुमंत माने, प्रशांत काटे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करताना म्हणाले की, शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श होते आणि गडकरी हे नव्या काळाचे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगतसिंग कोश्यारी यांनी जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे. त्याबद्दल छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने सदर वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध करत (दि.२९) नोव्हेंबरला इंदापूर बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच पुढील काळातही यासंदर्भात वेग-वेगळी आंदोलने देखील छेडणार असल्याचा इशारा संघटनेने या निवेदनाद्वारे दिला आहे.