बंगळुरु : उद्यापासून बंगळुरुत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या म्हणजे १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मायदेशात खेळताना भारतीय संघाचा नेहमीच दबदबा पाहायला मिळाला आहे. बांगलादेशचा सुपडा साफ केल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडला धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत मोठा खुलासा केला आहे.
मोहम्मद शमी हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात मोहम्मद शमीने मोलाची भूमिका पार पाडली होती. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे सारखं संघाबाहेर व्हावं लागलं होतं. यावर्षी जानेवारी महिन्यात त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो सरावासाठी मैदानात उतरला आहे. मात्र अजूनही तो पूर्णपणे फिट झालेला नाही.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
गेल्या काही महिन्यांपासून शमीच्या कमबॅकची चर्चा सुरु आहे. मात्र अजूनपर्यंत त्याला कमबॅक करण्याची संधी देण्यात आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शमीबाबत निर्णय घेणं जर कठीण आहे. त्याच्या गुडघ्याला सुज आहे. त्यामुळे तो जरा बॅकफूटवर आहे आणि त्याला पुन्हा नव्याने सुरु करावं लागणार आहे. आम्हाला अशा शमीला ऑस्ट्रेलियाला नाही घेऊन जायचं, जो पूर्णपणे फिट नसेल. पाहूया पुढे काय होतंय. ‘