पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरकाम करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला काम देण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर नेहून लिंबू सरबतातून गुंगीचे ओैषध देऊन लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे. ही घटना २७ सप्टेंबर रोजी कोथरुड परिसरात घडली आहे. याप्रकरणी सोनाली नावाच्या महिलेवर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार ज्येष्ठ महिला या दांडेकर पूल भागात राहण्यास आहेत. त्या घरकाम करतात. या महिलेची व त्यांची घटनेच्या आधी तीन दिवसांपुर्वीच ओळख झाली होती. या महिलेने त्यांना घरकाम मिळवून देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, तक्रारदार या २७ सप्टेंबर रोजी कोथरुड येथील मिर्च मसाला हॉटेलसमोरुन निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिला त्या ठिकाणी आली.
तुम्हाला काम मिळवून देते, असे तिने सांगितले. नंतर त्यांना हडपसर परिसरातील भेकराईनगर येथील एका फ्लॅटवर नेले. त्याठिकाणी लिंबू सरबतात गुंगीचे ओैषध टाकून पिण्यास दिले, त्यामुळे महिलेला गुंगी आली. तेव्हा त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन महिला पसार झाली.
गुंगी उतरल्यानंतर महिलेने परिसरातील नागरिकांकडे विचारणा केली. तेव्हा ती हडपसर भागात असल्याचे समजले. तिने कुटुबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तो अलंकार पोलिसांकडे वर्ग केला आहे.