बंगळुरु : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिली लढत १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांकडून आपल्या स्कॉडची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माही अॅक्शनमध्ये दिसून येणार आहे.या कसोटी दरम्यान रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड खुणावत आहे.
रोहित शर्मा सिक्सर किंग बनणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुमध्ये रंगणार आहे. या सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माने ५ षटकार खेचताच त्याच्या नावे एका रेकॉर्डची नोंद होणार आहे. रोहितने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ८७ षटकार खेचले आहेत. भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग या यादीत प्रथम स्थानावर आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये ९१ षटकार खेचले आहेत. या यादीत रोहितला प्रथम क्रमांकावर येण्याची संधी आहे.
भारतीय संघासाठी महत्वाची मालिका..
भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र भारताचं फायनलचं तिकीट अजूनही कन्फर्म झालेलं नाही. भारतीय संघाला इथून पुढे ८ कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन्ही संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत ८ पैकी ५ सामने जिंकावे लागणार आहेत.