मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणातील तीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आणखी तीन जणांचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात बाबा सिद्दीकी यांच्यासोबत झिशानसुद्धा बिश्नोई गॅंगच्या टार्गेटवर होता, असे वृत्त समोर येत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा झिशान त्यांच्यासोबत होता. दोघांना एकत्र मारायचे अन्यथा जो समोर येईल त्याला आधी संपवायचे, अशी सुपारी मिळाल्याचं चौकशीत समोर आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकी हे दोघेजण खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे निघाले होते. परंतु झीशानला फोन आला आणि तो परत ऑफिसला गेला. तेथून फोनवर बोलत असताना बाहेरुन बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचा आवाज आला. जर झीशानला तो कॉल आला नसता तर हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला असता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रॅंचने पुण्यातून अटक केली आहे.