चाकण : खेड तालुक्यातील म्हाळूंगे येथे गरबा उत्सवात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरब्यातून कॉलर पकडून बाहेर काढल्याच्या रागातून एकाच्या छातीत गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. इतक्यावरच न थांबता हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
ही घटना शनिवारी (दि. १२) रात्री उशिरा घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश आसाटी (वय-३८, रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सुरज गणपत कदम (वय-३०) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सौरभ मुळे (वय-२७) आणि त्याचे दोन मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळूंगे येथे छावा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्यावतीने भैरवनाथ मंदिराजवळ नवरात्र उत्सव व दांडीया तसेच गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरु असताना रात्री सव्वादहाच्या सुमारास सौरभ मुळे याने शंकर नवघणे यांच्या मुलाला गरब्यातून कॉलर पकडून बाहेर काढले. या कारणावरून शंकर नवघणे व सौरभ मुळे यांचे भांडण झाले होते.
दरम्यान, थोड्या वेळाने शंकर याची पत्नी व सौरभ यांची आई यांचे भांडण झाल्यामुळे दांडीयाचा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे तेथील महिलांनी सौरभला तु बाहेरून येवून आमच्यावर दादागिरी करतो का? असे बोलून त्याला हाताने, चपलांनी मारहाण केली. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांपैकी एकाने निलेश असाटी याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून असाटी यांच्या छातीत गोळी मारली. या घटनेत असाटी हे गंभीर जखमी झाले. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते करीत आहेत.