ठाणे : राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले.
सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, मुख्य अभियंता राजेश निघोट, मुख्य अभियंता एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते .
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती. ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे. या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे.
तसेच पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल. पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री. दादाजी भुसे म्हणाले, ठाणे खाडी पूल क्र.3 ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे.
आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे. दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार (दि.14) पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.