-गणेश सुळ
केडगाव : भांडगाव ( तालुका दौंड) येथील 76 वर्षीय कौसाआत्या जाधव यांनी 1980 व 90 च्या दशकामध्ये सुईनी म्हणून काम करत भांडगाव परिसरातील 140 गर्भवती महिलांचे जात व धर्म न पाहता सुखरुप प्रसुती केल्या आहेत. विना मोबदला सुखरूप प्रसुती करणाऱ्या कौसा आत्या सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर मातांसाठी देवदूतच ठरल्या आहेत.
आजच्या काळामध्ये महिलांची प्रसुती म्हटली की, 50 हजार ते 1 लाख रुपये खर्च ठरलेला असतो. परंतु पूर्वीच्या काळी खेडेगावामध्ये दवाखाने नसायचे. परिसरात यवत येथील शासकीय दवाखाना सोडला व एखादा दुसरा खाजगी दवाखाना सोडला तर दवाखानेच नव्हते. याशिवाय खेडेगावात दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक गावामध्ये काळाची गरज म्हणून जुन्या जाणत्या सुईनी असायच्या. शाळेची पायरी न चढलेल्या कौसाआत्या या त्यापैकीच एक निष्णात डॉक्टर आहेत असे म्हणावे लागेल.
त्या काळी स्वतः मोलमजुरी करणाऱ्या कौशल्या मच्छिंद्र जाधव या 24 तास बाळंतपणासाठी नेहमी उपलब्ध असायच्या. त्यांचे माहेरही भांडगाव असल्याने संपूर्ण गावांमध्ये कौसा आत्या म्हणून परिचित आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्या दिवसभर खुरपणी, विहीर खोदण्याचे काम, रस्त्याची कामे, द्राक्ष बागांमधील कामे सराईतपणे करायच्या. दिवसभर शेतामध्ये काम केल्यानंतर गावामध्ये कोणत्याही महिलेच्या पोटामध्ये दुखू लागले की, संबंधित कुटुंबातील जबाबदार व्यक्ती रात्री अपरात्री कौसा आत्याचे दार ठोठवायचा. दिवसभर मोलमजुरीच्या कामाने कितीही दमलेल्या असल्या तरी त्या या कामासाठी कधीच कंटाळा करत नसायच्या.
विशेष म्हणजे पती मच्छिंद्र जाधव यांचा त्यांना पाठिंबा असायचा. त्यामुळे एखाद्या महिलेच्या घरी कौसा आत्या गेली की, हमखासपणे ती महिला सुखरूप प्रसुती व्हायची. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसुती केल्या तरी कौसा आत्याच्या हातून एकही नवजात अर्भक किंवा त्याची आई दगावली नाही. या कामाची त्या कसल्याही मोल घेत नव्हत्या. परंतु संबंधित कुटुंबातील महिला कौसा आत्याला हौसेने चोळी बांगडी करायच्या. 2000 दशकामध्ये ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांचे प्रमाण वाढले. सुशिक्षित महिला प्रसुती डॉक्टरांकडे जाऊ लागल्या. त्यामुळे त्यांचे सुईनी म्हणून काम आपोआपच बंद झाले.
कौशल्या जाधव आजही वयाच्या 76 मध्ये शेतामध्ये रोजंदारीवर खुरपणीची कामे करतात. दिवसभर घरी बसून राहिले की अंग दुखते असा त्यांचा पूर्वानुभव आहे. कुटुंबातील सदस्यांचा विरोध डावलूनही त्या शेतात जातात. आयुष्यभर कष्ट केल्याने त्यांना आजतागायत कसल्याही आजारावरील गोळी चालू नाही. मुलगा अरुण जाधव हे बँक कर्मचारी तर स्नुषा रेश्मा जाधव या अंगणवाडी सेविका आहेत.आज देखील गावामध्ये कुणाचाही पाय मुरगळला, हात मोडला, चमक निघाली तरी कौसा आत्या स्वतःच्या हाताने चोळुन संबंधित पेशंटला नीट करतात.
पूर्वीचे जीवनशैलीमध्ये व आजच्या जीवनशैलीत खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या काळामध्ये सर्वांची शरीर निरोगी व कणखर असायची. तसेच त्या काळी अपूर्ण वैद्यकीय सुविधा, दळणवळणाच्या सुविधा नसणे यामुळे माझ्याकडून काळाची गरज म्हणून हे काम शक्य झाले. आजकालच्या काळात महिलांच्या गर्भधारणेपासून तर प्रसुतीपर्यंत होत असलेला खर्च पाहून आपण पुण्याचे काम करत होतो अशी जाणीव होते.
-कौशल्या जाधव -(भांडगाव)