मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते बाबा सिद्धीकी यांची काल रात्री हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात, पण जबाबदारी घेत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे. जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भ्रष्टाचारी सरकारविरोधातील आरोपपत्र घेऊन आम्ही जनतेच्या न्यायलयात जाणार आहोत. हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर पैसे खर्च करत आहे. जाहिरातबाजीऐवजी जनतेच्या सुरक्षेवर पैसे खर्च करा. पोलिसांचा उपयोग या गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? गद्दारी करुन आलेल्यांना आणि त्यांच्या घरच्यांना किती सुरक्षा आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. 2 ते 3 दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सरकार एका मागोमाग एक निर्णय घेत आहे. मात्र, अमंलबजावणी कशी होणार? हे सांगत नाही. महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
रिझल्ट देता येतं नाही त्यांनी घरी बसावं : शरद पवार
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणाबद्दल फारशी माहिती नाही. तपासावर परिणाम होईल, असं काही म्हणणार नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले. रिझल्ट देता येतं नाही त्यांनी घरी बसावं. दीड महिन्यात मंत्रिमंडळात किती निर्णय घेतले? त्यांच्या हातातून सत्ता घ्यावी लागेल. सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य आहे का? असा प्रश्नही शरद पवार यांनी केला.