पुणे : पुण्यात बोगस औषधांची विक्रीचे प्रकार समोर येत आहे. औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. अशातच पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या आजार बरा करण्याच्या नावाखाली पुण्यामध्ये औषधांची विक्री सुरु आहे. परंतु या बोगस औषधांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या औषधांचा प्रसार करण्यासाठी खोट्या जाहिराती केल्या जात आहेत. औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यांतर्गत 53 आजारांवरील उपचाराबाबत जाहिरात करण्यास प्रतिबंध असतांना सुद्धा बनावट औषधांची विक्री केल्या जात असल्याचे समोर झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 50 हजार रुपयांची बनावट औषधे जप्त करण्यात आली आहे. चिंचवडमधील न्यू मारुती आयुर्वेद, अमित मेडिको आणि महालक्ष्मी आयुर्वेदिक या तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे
चिंचवडमधील न्यू मारुती आयुर्वेद या विक्रेत्याकडून अमृत नोनी डी प्लस या औषधाची विक्री सुरू होती. या औषधाच्या वेष्टनावर मधुमेह बरा करण्याचा दावा करण्यात आला होता. या विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्याकडील 36 हजार 500 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच सदाशिव पेठेतील अमित मेडिको या विक्रेत्याकडून ऑर्थोजॉइंट ऑईल या औषधाची विक्री सुरू होती. या औषधाच्या वेष्टनावर संधिवात बरा करण्याचा दावा करण्यात आला होता. या विक्रेत्याकडील 5 हजार 727 रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. त्या विक्रेत्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.
तसेच बारामती मधील कसबा येथील महालक्ष्मी आयुर्वेदिक या औषधलायात मूतखडा बरा करणाऱ्या भगत किडकरे या औषधाची विक्री सुरु होती. या दुकानावरसुद्धा कारवाई करत चार हजार रुपयांचे औषध जप्त करण्यात आले. ही कारवाई सहआयुक्त गिरीश हुकरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक म. बा. कवटीकवार, रजिया शेख आणि स. शि. बुगड यांनी केली.