पिंपरी : तळवडे ते चऱ्होली हा प्रवास आता सुसाट होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने देहू ते आळंदी रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. या कामासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रचंड पाठपुरावा केला होता. नागरिकांची गैरसोय, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण होणे गरजेचे आहे, असा मुद्दा आमदार लांडगे यांनी निदर्शनास आणून दिला होता. याची दखल घेत प्रशासनाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून, लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
भोसरी मतदारसंघात येणाऱ्या तळवडे ते चऱ्होली या भागामध्ये प्रचंड नागरिकरण वाढले आहे. त्याच तुलनेत तळवडे, चिखली, मोशी या भागात लघुउद्योग देखील मोठ्या प्रमाणात आहे. तळवडे ते चऱ्होली या दोन परिसरांना जोडताना मधोमध पुणे-नाशिक महामार्ग देखील जातो. त्यामुळे या महामार्गावर देखील वाहतूक कोंडीचा परिणाम दिसून येतो. असे निदर्शनास आल्यानंतर देहू आळंदी हा रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला निदर्शनास आणून दिले होते. याबाबत सातत्याने आमदारांनी प्रशासनासोबत पत्र व्यवहार देखील केलेला आहे.
दरम्यान, देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गावर चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येणारे पाणी आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनचे काम याच रस्त्यावर झाले आहे. या कामामुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. तळेगाव, चाकण एमआयडीची रहदारी मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावर होत असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवत असल्याचा मुद्दा समोर आला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण वारंवार निर्माण होत असल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक, नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
त्यामुळे तातडीने देहू आळंदी रस्त्याचे काम हाती घ्यावे. येथील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम कराव्यात. अत्याधुनिक पद्धतीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देहू आळंदी रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्याबाबतची निविदा प्रसिद्ध केली असून लवकरच हे काम पूर्ण होईल.
भोसरी मतदारसंघात येणाऱ्या तळवडे ते चऱ्होली या
भागातील वाढते नागरीकरण सध्या कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या परिसरासाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आलेले आहे. देहू आळंदी रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण तसेच मजबुतीकरण होणार आहे, जेणेकरून शहराच्या दोन टोकांना जोडणारा हा टप्पा विना अडथळा पार होऊ शकेल. या रस्त्यावरील वाहतूक, पार्किंग व्यवस्था, संबंधित जोड रस्ते या सर्वांचा विचार केला जात आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
आमदार महेश लांडगे, भोसरी विधानसभा