सोलापूर : स्वतंत्र मराठवाडा आंदोलनाची शक्कल काढणाऱ्या अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर येथे आज गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या सगळ्या प्रकारानंतर सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली.
काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठवाडा आणि विदर्भ राज्याची मागणी केली होती. त्यांचा राज्यकारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी त्यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये परिषदही घेतली. या संवाद परिषदेआधीच वातावरण तापले होते. परिषदेचे बॅनर फाडण्यात आले होते. सदावर्ते यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेड आणि काही संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज सोलापूरमधील पत्रकार परिषदेत त्याचे पडसाद उमटले.
संभाजी ब्रिगेडने संविधान दिनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना लाज वाटली पाहिजे. माझ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. तरीही माझ्या अंगावर काळी पावडर फेकण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरही ती काळी शाई फेकली. या लोकांना आम्ही घाबरत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ, असे गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले.
सदावर्ते यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे जिलाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी शाई फेकताना निषेध नोंदविला. आज संविधान दिवस आहेत. गुणरत्न सदावर्ते हे महापुरुषांच्या या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. या महाराष्ट्रातला लहानातला लहान कार्यकर्ता म्हणून या गुणरत्न नव्हे तर गुणउधळे सदावर्तेचा निषेध करत आहोत.