मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. उपुख्यामंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित सयाजी शिंदे यांचा प्रक्ष प्रवेश पार पडला.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. तसेच त्यांनी फक्त मराठी नाही, तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध आहेत. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठं केलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता राजकारणात सयाजी शिंदे यांनी प्रवेश केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले : सुनील तटकरे
अभिनेते यांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फोकसने सुरू झाली आहे. सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले असून त्यांनी सिनेक्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे. मराठी मनाला अभिमान वाटावं असं आहे. त्यांनी आपल्याला सीमित ठेवलं नाही. तसेच सयाजी शिंदे यांनी पर्यावरणावर चांगलं काम केलं आहे, असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले.