पुणे : गेल्या आठवड्यात बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी मात्र फरार होते. त्यांना शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरु होते. अखेर या प्रकरणातील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून फरार असलेल्या आरोपींबाबत पुणे पोलिसांना काही धागेदोरे हाती लागले होते. त्याद्वारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना घडली त्या रात्री येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याचे आढळून आले. या सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
मात्र, पुणे पोलिसांनी याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही घटना घडल्यापासून पुणे पोलिसांची 60 पथके हे आरोपींच्या मागावर होती. परंतू , तरीही आरोपींचा शोध लागत नव्हता. मात्र आता आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.