पिंपरी : प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन नंतर स्वत: आत्महत्या केली. ही घटना पिंपरी- चिंचवड येथील खराळवाडीमधील हॉटेल राज प्लाजा या लॉजवर गुरुवारी घडली. या घटनेनंतर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान काही तासांतच तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.
नितेश नरेश मीनेकर (वय 34 वर्ष) असे प्रियकराचे नाव आहे. तर करिष्मा ईश्वर घुमाने असे तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात एक लॉज आहे. त्या लॉजवर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास प्रियकर आणि प्रेयसी भेटले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये काही कारणावरुन जोरदार भांडण झाले. हे ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने 112 नंबर वर फोन करून पोलिसांना बोलून घेतले. त्यावेळी तात्काळ पोलीस हॉटेलमध्ये आले, त्यांनंतर पोलीसांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा वाजवला. रुममधून नितेश कपडे घालत आहे. थांबा दरवाजा उघडतो, असे उत्तर दिले. मात्र, त्यानंतर बराच उशीर झाला दरवाजा उघडत नसल्याने पोलीसांनी दरवाजा तोडला. तेव्हा, करिष्मा रक्ताच्या थारोळ्यात दिसली तर नितेशने गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.