पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. यंदा मात्र या दोन्ही परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गट ‘क’ व गट ‘ब’ परीक्षेच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्ध झाल्या असून महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा एकत्र न होता वेगवेगळ्या होणार आहेत. या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे.
प्रसिद्ध जाहिरातीनुसार गट ‘क’ अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण १ हजार ३३३ रिक्त जागा तर गट ‘ब’ अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या ४८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अनेक दिवसांपासून जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षाधारक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीकडे जाहिरात काढण्याची विनंती केल्याचे सांगितले होते.
अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम मुदत ४ नोव्हेंबर देण्यात आली आहे. महाराष्ट्र गट ‘ब’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ ही ५ जानेवारी २०२५ ला होणार आहे. ४८० पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बहुप्रतीक्षित अशा पोलीस उपनिरीक्षक पदांचा यामध्ये समावेश आहे, यात सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी ५४, राज्य कर निरीक्षक २०९ आणि पोलीस उपनिरीक्षक २१६ पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.