पुणे : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात बराच धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे ठाण्यासह पालघर आणि कोकणात गुरुवारी (ता. १०) जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यातही पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे या विभागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, नवी मुंबईसह पालघर, ठाण्यातही तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले असून गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय झाले आहे. परिणामी वायव्येकडे जाताना या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात परतीचा पाऊस चांगलाच जोर धरणार आहे. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.