हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांच्या क्रिडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे आयोजन २३ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आले होते.
या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील उपसरपंच शरद आव्हाळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले. तर क्रिडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय अॅथलेटीक्स खेळाडू धनंजय मदने उपस्थित होते.
नर्सरी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी या क्रिडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये लहान गटासाठी लिंबू-चमचा, माळ बनविणे, बाटलीमध्ये पाणी भरणे, रेडी फॉर स्कूल, फ्रॉग जंप, झीक-जॅक रनिंग, बॉल बकेट, लगोरी, चेअर इन फ्रंट इ. अनेक खेळ स्पर्धा घेण्यात आल्या. मध्यम गटासाठी रनिंग रेड, धावण्याची स्पर्धा, गोळा फेक, बॅडमिंटन व बुद्धिबळ अशा खेळ स्पर्धा घेण्यात आल्या. मोठ्या गटासाठी थाळी फेक, भालाफेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, रायफल शूटिंग, कबड्डी व क्रिकेट या खेळ स्पर्धा घेण्यात आल्या.
इ. ६ वी मधील समृद्धी संदिप काळभोर या विद्यार्थिनीने धनुर्विद्या या खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. इयत्ता ५ वी व ६ वीच्या मुलींनी रिल्स व मुलांनी सादर केलेल्या डमबेल्स प्रात्यक्षिकांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हॉर्स रायडिंगची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. स्पर्धेच्या समारोपानंतर बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पालकांनी हजेरी लावली होती.
स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून स्वागत केले. तसेच उपस्थित सर्व पालकांचे स्वागत करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कूलच्या विश्वस्त मंदाकिनी काळभोर, प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या काळभोर, रामदास काळभोर, अक्षय काळभोर, प्रथमेश काळभोर उपस्थित होते. तसेच स्कूलचे क्रिडा शिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनस्नेहल साळवी, पूनम सिंग, शिरीन सय्यद, सीमा गिरी, विपुल पाटील यांनी पार पाडली. क्रिडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी रेनबो स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.