नागपूर: विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोमाने वाहू लागले आहे. त्यासोबतच राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीत सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भेट घडवून आणली गेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मागील ४ दिवसांत २ वेळा बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे आणि रविकांत तुपकर यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत सहभागी करून त्यांना काही जागा दिल्या जाण्याची शक्यता असून, यामध्ये बुलढाणा विधानसभेसाठी रविकांत तुपकर आग्रही असल्याचे कळते. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यात २५ ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा पुणे येथील बैठकीत केली होती. बुलढाणा, वर्धा, वाशिम, लातूर, हिंगोली यासह विविध जिल्ह्यांत तुपकरांनी मेळावे व सभांचा धडाका सुरू केला आहे.
लोकसभेत बुलढाणा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवून तुपकरांनी अडीच लाख मते घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीला कडवी झुंज दिली. थोड्या फरकाने तुपकरांचा पराभव झाला. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व उबाठा शिवसेना या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाल्याची तसेच उद्धव ठाकरेंनी निमंत्रण देऊन तुपकरांनना चर्चेसाठी बोलावून घेतल्याची माहिती आहे.
बुलढाण्यात होणार मोठी राजकीय उलथापालथ !
रविकांत तुपकर महाविकास आघाडीत सहभागी झाले, तर बुलढाणा जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळेल. रविकांत तुपकरांची जिल्ह्यातील लोकप्रियता पाहता महाविकास आघाडीला जिल्ह्यात निश्चित मोठे बळ मिळू शकते.