मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने लोकसभेत महायुतीला चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर मात्र भाजपने हरियाणात मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपसाठी हा डोस समजला जात आहे.
हरियाणा सरकारने ५० दिवसांत घेतलेले १२६ निर्णय हे निकाल बदलणारे ठरले, असे मानले जात आहे. अशातच आता महाराष्ट्रातही भाजपने निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. या आधारावरच आगामी निवडणूक जिंकता येईल, असा सूर भाजपकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हरियाणातील कठीण विधानसभा निवडणूक जिंकत असताना भाजपने जागांची नाराजी लक्षात घेत अन्य जातींना एकत्र आणले. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठा समाजांचे मेळावे घेत भाजप मतांची बेगमी करत आहे. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आजपर्यंत १६८ छोट्या – मोठ्या जातींचे मेळावे घेतले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सोबत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
राज्यातील मराठा समाज सत्ताधारी भाजप पक्षावर नाराज असल्यामुळे भाजपने ‘प्लॅन बी’ म्हणून ओबीसी समाजाचे छोटे-छोटे मिळावे सातत्याने आयोजित करणे सुरू केले आहे. भूपेंद्र यादव यांनी गेले काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात मांडव घालून छोट्या जातींशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभेला तोंड पोळलेल्या महायुतीनं आणि विशेषतः भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी भाजप ‘प्लॅन बी’ तयार करत आहे. एकेका जागेवर भाजप लक्षकेंद्रीत करताना दिसत आहे. यासाठी संघही भाजपसाठी मैदानात उतरला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची गणितं बदलून भाजप इतिहास घडवणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.