चांदवड : कौटुंबिक कारणांतून पत्नीस मारहाण करण्याबरोबरच आपल्या सहा वर्षीय बालकास छताला उलटे लटकावून त्यास मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे उघडकीस आला. याप्रकरणी संशयित पित्याविरोधात वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पीडित पत्नी सुनीता मंगेश बेंडकुळे यांनी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंगेश नंदू बेंडकुळे (रा. धोतरखेडे, ता. चांदवड) याने कौटुंबिक वादातून २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सुनीतासोबत भांडण करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांचा मुलगा नीलेश (६) यालाही मंगेशने मारहाण केली. एवढेच नाही तर लहानग्या नीलेशचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला घराच्या छताच्या पाईपला जवळपास १५ मिनिटे उलटे लटकवून ठेवले. तसेच सुनीतास मारहाण करीत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मंगेश बेंडकुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. तागड तपास करीत आहेत.
आधीच आजारी, संताप अघोरी
याविषयी बोलताना सुनीता बेंडकुळे यांनी अधिक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नीलेश काही दिवसांपासून आजारी होता. त्याला रुग्णालयातही नेले होते. गाठ असल्यामुळे त्यास पिंपळगाव बसवंत येथे सोनोग्राफी करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यास मंगेशने नकार दिला. त्यानंतर घरी आल्यावर नीलेशच्या सोनोग्राफीसाठी खर्च करणार नाही, असे सांगत मंगेशने नीलेश यास उलटे टांगले आणि आपणासही मारहाण केली, असे सुनीता यांचे म्हणणे आहे.
नेमका कशामुळे घडला प्रकार?
धोतरखेडे येथील घटनेत चिमुकला आजारी असल्याने त्याच्यावर उलटे टांगून अघोरी उपचार करण्यात आले असावेत, असा संशय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केला. मुलाला दवाखान्यात औषधोपचारासाठी जास्त पैसे खर्च होत असल्याने संशयिताने मुलाला छताला उलटे टांगून बेदम मारहाण केल्याचे फिर्यादी पत्नीने सांगितले असले, तरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत मात्र तिने पतीच्या प्रेमसंबंधाबाबत तक्रार केली असून, त्यातून मुलास उलटे टांगल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका अंधश्रद्धेतून की कौटुंबिक वादातून घडला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.