पिंपरी : पिंपरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार पाठलाग करुन लैंगिक छळ केल्याने एका १२ वर्षाच्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून हा सर्व प्रकार उघड झाला आहे. भोसरी पोलिसांकडून दोघा मुलांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार भोसरीमधील महादेव कॉलनीत ६ जून रोजी सकाळी साडेसात वाजता घडला होता. क्षितीज लक्ष्मण पराड (वय २०, रा. भोसरी), तेजस पांडुरंग पठारे (वय १९, रा. चर्होली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चहाची टपरी आहे. त्यांच्या मुलीने ६ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. फिर्यादी यांनी पाहिलेले सीसीटीव्ही फुटेज तसेच तिच्या खिशामध्ये मोबाईल आढळून आला. या मोबाईल नंबरवरुन क्षितीज पराड व तेजस पठारे यांनी फिर्यादीच्या मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा लैंगिक छळ करत असल्याचे उलगडून आले. त्यामुळे दोघांच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.