मुंबई : लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खूशी माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार नाही. हे काम जर सत्तेचाळीस साली कोणी केलं असतं, तर 1500 रुपये मला देखील मिळाले असते, अशी भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली आहे. नुकतंच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषा विभागाच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा भोसले यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी सन्मान सोहळ्याला ज्येष्ठ गायिका यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
काय म्हणाल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले?
आशा भोसले म्हणाल्या, लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खूशी माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार नाही. हे काम जर सत्तेचाळीस साली कोणी केलं असतं, 1500 रुपये मला मिळाले असते, तर मी दोनवेळ जेवू शकले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मी अन्न साठवून ठेवायचे. मी दुपारी जेवू शकत नव्हते. जेव्हा माझे पती घरी यायचे, तेव्हा आम्ही एकत्र जेवायचो. तेवढंच जेवण माझ्याजवळ असायचं, असं आशा भोसले यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना म्हणाल्या, ज्या महिलांकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी हे 1500 रुपये खूप महत्वाचे आहेत. अशा महिलांसाठी तुम्ही खूप चांगले काम केलय. मी त्यांच्या वतीने तुमचे आभार मानते, कारण या परिस्थितीतून मी गेले आहे, अशा भावना आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.
मी संगीत क्षेत्रात असले तरी मी एक गृहिणी आहे. एका महिलेला घरात जे काम करावं लागतं, ती सर्व कामं मी करते. घरातलं काम करता करता, मुलांना मोठं केलं. भोसले कुटुंब सांभाळलं. हे करता करता कधी ९२ वर्षांची झाले, हे ही कळलं नाही. कधी उपाशी राहून तर कधी जे आहे ते खाऊन दिवस काढले. पण कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. हाच माझा गुरुमंत्र होता, असंही अशा भोसले यावेळी म्हणाल्या.