पुणे : पुणे – मुंबई महामार्ग आणि नगर रस्त्याला जोडणाऱ्या रिंग रोडचे सोलू ते वाघोली दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ने रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई महामार्ग ते नगर रस्ता या दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार आहे.
सोलू ते वडगाव शिंदे या दरम्यान साडेसहा किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे, तर लोहगाव- वाघोली आणि वडगाव शिंदे हा साडेपाच किलोमीटरचा मार्ग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्या मार्गाचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.
त्यामुळे हिंजवडी रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून वाघोली, लोहगाव, आळंदी, मोशी, निगडी, पुनावळे ते हिंजवडी असा रस्ता तयार होणार आहे, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्पाइन रोडपासून पठारे चौक, चऱ्होली – निगडी आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू असून, ते ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या रस्त्यामुळे नगरहून मुंबईकडे जाणारी किंवा मुंबई रस्त्याने येऊन नगरकडे जाणारी वाहने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात न येता रिंग रोडच्या माध्यमातून बाहेरून जाऊ शकतील.
त्यामुळे संबंधित वाहनांचा प्रवास अडथळे विरहीत होईल, तर शहरी होणाऱ्या अवजड वाहतुकीलादेखील ‘ब्रेक’ लागेल. सध्या या सर्व वाहनांची वाहतूक प्रामुख्याने शहरातूनच होते.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक व दळणवळण गतिमान करण्यासाठी रिंग रोडची आखणी करण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षांपासून चर्चेच्या स्तरावर अडकलेल्या रिंग रोडसाठी ‘हुडको’कडून विविध प्रकल्पांसाठी कर्ज घेण्याच्या ‘रस्ते विकास महामंडळा’च्या (एमएसआरडीसी) प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे.
त्यामुळे या रिंग रोडसाठी ११ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीमुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळणार असून, कामही लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.