पुणे : राज्यामध्ये पावसाने परतीचा प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे तयार झाले असून हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून त्यामुळे उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशाच्या पार गेला आहे. रविवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ३५ अंशाचा पार आहे.
उकाड्यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, आज (ता. ७) मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.