बारामती : महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकी देत कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अनिरुद्ध उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा.चंद्रमणीनगर, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जुलै २०२४ ते ३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शारदानगर, माळेगाव येथे रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी हा प्रकार घडला. फिर्यादी ही महाविद्यालयात गेल्यावर आरोपी तिच्या मागोमाग जात होता. महाविद्यालय सुटल्यावर गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत होता. तेथे तिला मारून टाकीन, अशी धमकी देत कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.