Maharashtra Politics : राज्यात सद्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे दोन नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत. महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीत मिळणार आणि महाविकास आघाडीत नाही मिळालं तर महायुतीतून मिळणार असल्यांच त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
आज अजित पवार गटाचे दोन बडे नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, आपल्याला त्याबाबत माहिती नाही. मात्र इकडे तीन पक्ष, तिकडे तीन पक्ष आहेत. दोघांना तिकीट मिळणार, एक इकडून एक तिकडून. ज्यांना तिकिटे नाही मिळणार ते इकडून तिकडे ते तिकडून इकडे जाणार. इकडे पण आयाराम गयाराम तिकडे पण आयाराम गयाराम होणार. त्याच्यामध्ये फार असे काही नावीन्य नाही. एखादा पक्षाच्या वाट्याला ती जागा येते पण त्यांच्याकडे उमेदवार योग्य नसेल तर दुसरीकडील इच्छुक उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जात असते.