इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी घरोबा केल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी आज (दि.६) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत, शहर व ग्रामीण कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली. इंदापूर विधानसभेसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा जागांपैकी चार जागा भाजपने लढवाव्यात अशी मागणी आपण वरिष्ठांकडे केल्याची माहिती ही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, मारुती वणवे, माऊली चवरे, तानाजी थोरात, दीपक काटे,सदानंद शिरदाळे, रामचंद्र निंबाळकर,युवराज मस्के, राजकुमार जठार, बाळासाहेब पानसरे, तेजस देवकाते,नाना शेंडे, शिवाजी निंबाळकर,माऊली वाघमोडे, रमेश खारतोडे, रमेश चांदगुडे, वैभव देवडे,पांडुरंग शिंदे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
काळे म्हणाले की, गेल्या चार पाच दिवसात झालेल्या घडामोडीमुळे भाजपचे कार्यकर्ते खाली शिल्लक आहेत की, नाहीत याबाबत मतदारांचा संभ्रम झाला आहे. मात्र मतदारांनी काळजी करण्याचे कारण नाही. येणारा काळ भाजपचा संक्रमणाचा काळ आहे. भाजप हा देशप्रेम व विचाराला बांधिल असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इंदापूर तालुक्यात याआधी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती असताना भाजपला किमान ३८ हजार तर लोकसभा निवडणुकीत कमाल मतदान ६७ हजार मतदान झालेले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पर्याय देणारा पक्ष म्हणून भाजप कसा उभा राहिल. नंतरच्या काळातील नगरपरिषद, पंचायत समिती व सहकारातील सर्व निवडणूका पक्षाला ताकदीने लढता आल्या पाहिजेत. यासाठी पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठी आजची नियोजन बैठक घेतली आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.