योगेश शेंडगे
रांजणगाव : रांजणगाव एम आय डी सी (MIDC) तील कारेगाव हद्दीमध्ये असणाऱ्या SYRMA SGS कंपनीच्या ऑफिसमध्ये कर्डेलवाडीच्या माजी सरपंचासह चार जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करत लेबर कॉन्ट्रॅक्टचे काम मिळवण्याच्या कारणावरुन कंपनीच्या एच आरला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिनेशकुमार योगेंद्र मिश्रा (वय ४३) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ११.४५ च्या सुमारास रांजणगाव एमआयडीसी, प्लॉट नंबर G-3, येथील SYRMA SGS कंपनीच्या ऑफिसमध्ये मारुती फरगडे, अभिजीत फरगडे, आशिष दसगुडे तसेच त्यांच्यासोबत इतर दोन अनोळखी इसम सर्वजण (रा. कर्डेलवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी कंपनीतील सिक्युरिटी गार्ड किंवा इतर कोणाचीही परवानगी न घेता, कंपनीचे आवारामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन ऑफिसमध्ये घुसून कंपनीमध्ये ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’ चे काम मिळवण्याच्या कारणावरुन मारुती फरगडे याने ऑफिस मधील खुर्ची उचलून ती खुर्ची दिनेशकुमार मिश्रा यांना फेकुन मारली.
त्यामुळे मिश्रा यांच्या डाव्या हाताच्या मनगटास दुखापत झाली. तसेच अभिजीत फरगडे, आशिष दसगुडे व त्यांच्यासोबतच्या इतर दोन अनोळखी इसमांनी मोठमोठ्याने आरडा-ओरडा, शिवीगाळ करत मिश्रा यांना मारहाण करण्याकरिता त्यांच्या अंगावर धावून आले आणि शर्टची कॉलर पकडून, हाताने मारहाण केली. तसेच आम्हाला लेबर कॉन्ट्रॅक्ट नाही दिल्यास, तु येथे काम कसे करतो…? असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.
त्यानंतर दिनेशकुमार मिश्रा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच आरोपीपैकी कर्डेलवाडीचे माजी सरपंच संतोष कर्डीले यांना पोलिसांनी अटक केली असुन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात या घटनेचा पुढील तपास करत आहेत.