अहमदनगर : बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या प्रकरणाची धग ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यामधून अशीच एक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात आला आहे. ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला असल्याचे समोर आले आहे. शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या आणि घडलेल्या प्रकार पालकांना सांगितला. बाळशीराम यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
नेमका प्रकार काय?
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये खराडी जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव बांबळे या शिक्षकाने लाज वाटेल असे असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. मुख्यध्यापकांनी त्या सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या कारनाम्याचा बद्दल सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नव्याने रूजू झाल्यानंतर हा प्रकार..
वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे शाळेत नव्याने रूजू झाले होते. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.