पुणे- आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दोन दिवसांपुर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याने प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आज २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृती विषयासंदर्भात माहिती दिली.
ते उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांनी डोळे उघडले आहेत. त्याबरोबरीने हात आणि पायांची देखील हालचाल होत आहे. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटरचा सपोर्ट देखील काढण्यात येणार असून रक्तदाब व हृदयक्रिया देखील स्थिर असल्याचे याद्गीकर यांनी सांगितले. सध्या विक्रम गोखले यांच्यावर क्रिटिकल केयर युनिटमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
बुधवारी विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी पसरली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी वृषाली यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना हे वृत्त फेटाळून लावले होते.
त्यांच्या मुलीने देखील गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले होते. यामुळे सोशल मीडियावरील अफवांचा त्रास गोखले कुटुंबाला नाहक सहन करावा लागला होता.