पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करून त्यासाठी 20 नियमित पदे व 6 पदांची सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यात येईल. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरसाठी 20 नियमित पदे व 4 पदांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मंजूरी देण्यात आली. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालयासाठी 3 नियमित पदे मंजूर करण्यास व एका पदाची सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. ही न्यायालये स्थापन झाल्यामुळे इंदापूर येथील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होईल. तसेच या तालुक्यामधील जनतेच्या दृष्टीने न्यायदान प्रक्रिया जास्त लोकभिमुख होईल.