पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ४) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. तसेच माजी अध्यक्ष माणिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष माणिक चव्हाण, माजी उपाध्यक्ष सुनील रासने, विद्यमान उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते. दरम्यान, सन २०२६-३१ या पुढील पाच वर्षांसाठी महेश सूर्यवंशी आणि सन २०३१- ३६ या त्या पुढील पाच वर्षांसाठी हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषवणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले आहे.
सुनील रासने हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ सक्रिय आहेत. तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वतः रस्त्यावर उतरुन त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात स्वच्छता, दानपेटी सारख्या विषयात ते स्वतः लक्ष देतात. त्यांच्या आवाजातील गणपती बाप्पाची महाआरती सर्वत्र प्रसिद्ध आहे. हसतमुख असलेले आणि मंदिरात कायम उपलब्ध असणारे विश्वस्त म्हणून त्यांची ओळख असून ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष कै. मामासाहेब रासने यांचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत.
यापूर्वी दि. १५ सप्टेंबर २०२२ साली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ट्रस्टच्या पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सन २०२२ ते २०२४ याकाळात माणिक चव्हाण यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी विश्वस्त मंडळात इतर पदभार देखील बदलण्यात आले होते. ते २०२४ ते २०२६ या कालावधीकरिता कायम ठेवण्यात आले आहेत. सन २०२४ ते २०२६ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत.