पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाची तारीख ठरली नव्हती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही जाहीर केली आहे.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या तारखेवरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिलं. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती दिली. तसेच, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेत आहे. माझा प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटलं होतं.