पुणे : शिक्षण घेऊन समाजात आणि आर्थिक व्यवहारात प्रगती होते. पण योग्य शैक्षणिक पद्धतीतून मिळालेले प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही क्षेत्रात यशस्वीतेचा पाया ठरतो. असे पाठ्य पुस्तकाबरोबर शिक्षणाची वेगळी गोडी लावण्याचा प्रयत्न करत विद्यार्थी घडविण्याचे काम केले. गेली 31 वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवा करणारी शिक्षिका प्रमिला संजय जोरी ही शिक्षणातील सरस्वती नवदुर्गा ठरली आहे. तिने विद्यार्थ्यांना सरस्वतीच्या वाणीने शिक्षण देऊन कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत वेगवेगळ्या पुरस्काराची मालिका तयार केली आहे. वेगवेगळ्या गावात शिक्षक म्हणून संधी मिळत गेली तशी ती विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये कौतुकाचा विषय ठरत गेली.
मुळगाव आंबेगाव तालुक्यातील शिनोली असले तरी तिचे प्राथमिक शिक्षण अंबरनाथ व कल्याण येथे झाले. पदवी घेऊन आंबेगाव तालुक्यातील डिंभा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 6 जुलै 1995 पासून ज्ञान दानाचे पवित्र काम त्यांनी हाती घेतले. या काळातच जांबूत ( ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मधील उपशिक्षक संजय जोरी यांच्याशी विवाह झाला. मुलगा विराज आणि मुलगी समिक्षा असा या दांपत्याचा परिवार आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे प्रमिला जोरी यांची बदली झाली. त्यानंतर त्यांचा शैक्षणिक ज्ञान दानाचा कार्यकाल बहरत गेला. येथे पाच वर्षे त्यानंतर त्यांना जाबूंत येथील प्राथमिक शाळेत 10 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. 2008 मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव कला क्रीडा महोत्सवात जिल्हा पातळीवरील लोकनृत्यात सलग तीन वर्षे वकृत्व, लेझीम व लोकनृत्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात यश आले. त्यांच्या यशाचे जांबूत ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय शिक्षणाबरोबर स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे सुट्टीच्या काळात देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी 2011 मध्ये गुणवत्ता यादीत 3 विद्यार्थी गुणवत्ता धारक केले.
सन 2013 मध्ये शिंगवे ( ता. आंबेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांची बदली झाली. या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी जिल्हा पातळीपर्यंत खेळाचे संघ उतरविले होते. त्यानंतर 2016 मध्ये 16 विद्यार्थी त्यांचे शिष्यवृत्ती धारक तर 2 विद्यार्थी नवोदय पात्र ठरले. 2019 मध्ये मोरडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बदली झाली. तेथे देखील सतत तीन वर्षे यशवंतराव कला क्रीडा महोत्सवात लेझीम खेळात जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला होता. 2023 -2024 मध्ये पाचवीचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांकावर यश मिळण्यास पात्र झाला होता. पालक व ग्रामस्थांनी त्यांना दुचाकी देऊन सन्मान केला आहे.
प्रपंचाचा गाडा हाकत परिवाराला साथ देण्यात देखील त्या यशस्वी ठरल्या. त्यामुळे मुलगा बांधकाम अभियंता, मुलगी कला शाखेची पदवी व शिक्षण शास्त्र पदवी असे उच्च पदवी पर्यंतचे शिक्षण देण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यांचे अनेक माजी विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या 31 वर्षाच्या गुणवत्ता पुर्ण शैक्षणिक सेवेसाठी त्यांना अनेक ठिकाणी पुरस्कार देत त्यांचे कौतुक केले गेले. विद्यार्थी केंद्रबिंदू ठरवून त्यांना यशस्वीतेच्या मार्गाकडे नेण्यासाठी प्रयत्न केला. त्यात सहकारी शिक्षक, ग्रामस्थ व पालकांनी साथ दिली. त्यामुळे यशस्वितेचा मार्ग सोपा होत गेला, असे प्रमिला जोरी यांनी सांगितले.
पुरस्कारांची मालिका….
2007 व 2008 मध्ये जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक, 2011 शिरूर तालुक्याचा आदर्श शिक्षक, 2014 ला आंबेगाव तालुक्याचा आदर्श शिक्षक, 2015 मध्ये शिक्षक सक्षमीकर वक्तृत्व स्पर्था व्दितीय क्रमांक, 2016 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक, 2017 मध्ये जिल्हा गुणवंत आदर्श शिक्षक, वक्तृत्व परीक्षेत व्दितीय क्रमांक, 2015 स्टोरी टेलींग प्रथम, 2018 मध्ये यशवंत कला क्रीडा महोत्सवात नाटक प्रथम क्रमांक, 2023 मध्ये जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक असे पुरस्कार मिळाले आहेत.
शब्दांकन : युनूस तांबोळी (उपसंपादक – पुणे प्राईम न्युज)