शिरुर : पन्नास वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरुन खाली जमिनीवर पाडून तिच्या कंबरेवर, पाठीवर, तसेच पोटावर लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामा केशव केदारी, मन्या ऊर्फ अदित्य रामा केदारी, सोन्या बापु केदारी, सखाराम बापु केदारी अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत एका ५० वर्षीय महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या गावातील एका टपरीमध्ये माचीस आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी कॅनॉलवरील पुलावर त्यांच्या गावातील रामा केदारी, मन्या केदारी, सोन्या केदारी, सखाराम केदारी हे सर्वजण उभे होते. त्यावेळी फिर्यादींना रामा केदारी यांनी ‘तुझा भाचा सागर गोरे हा कुठे आहे’ अशी विचारणा केली असता फिर्यादी महिलेने मला माहीत नाही असं सांगितलं.
त्यानंतर त्या टपरीकडे जात असतांना रामा केदारी याने त्यांच्या तोंडावर आणि गालावर हाताने मारहाण केली. त्यावेळी तेथे उभा असलेला मन्या केदारी याने त्यांना ढकलुन खाली पाडले. त्यानंतर सोन्या केदारी आणि सखाराम केदारी यांनी त्यांच्या कंबरेवर, पाठीवर, पोटावर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली, असं फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करत आहेत.