पुणे : प्लॉटच्या जागासंबंधाने आलेल्या तक्रारी अर्जावरून कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुरुवारी (ता.२४) गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज अनंत पाटील (पद-सहायक पोलीस निरीक्षक तत्कालीन नेमणूक – कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर) असे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नावे आहेत. याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पत्नी व सासरे यांच्या विरोधात जागा/प्लॉटच्या संदर्भाने आलेल्या तक्रारी अर्जावरून कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी आरोपी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातीरजमा केला असता, तक्रारदार यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी २ लाख रुपयांची लाच मागणी केली असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.