शिक्रापूर (पुणे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या ११५ एकरातील ग्राँझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत डायनामाइट स्फोटकाचा वापर करुन ब्लास्टींग सुरु असल्याने परिसरातील कंपन्यासह नागरिक या स्फोटांनी हादरले आहे. त्यानंतर महसूलने केलेल्या पाहणीत तब्बल २५० गुंठे क्षेत्रात उत्खनन केल्याचे आढळले आहे.
स्थानिकांकडून गेल्या काही दिवसांपासून याबाबत तक्रारी केल्या होत्या. कंपनीचे सुरू असलेले हे ब्लास्टींग स्थानिकांच्या आक्षेपानंतर महसूल विभागाने बंद केले. बेकायदेशीरपणे चाललेल्या कामातील ब्लास्टींगचा आणि काढलेल्या मुरुमाचा पंचनामा केल्याची माहिती तलाठी गोविंद घोडके यांनी दिली.
सणसवाडी येथील एका भागात गेल्या काही दिवसांपासून डायनामाईटसारखी धोकादायक ब्लास्टींग स्फोटके वापरून मोठ्या प्रमाणात ब्लास्टींग सुरू असल्याने परिसरातील औद्योगिक वसाहत धास्तावली. मात्र, या कामासाठी परवानगी घेतली नसल्याचे समजल्यानंतर सरपंच रूपाली दरेकर, उपसरपंच राजू दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, अॅड. विजयराज दरेकर आदींनी कंपनीला भेट देत वरील बाबतीत तक्रार केली व हे काम त्वरित थांबवून परवानगीसाठी रीतसर अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर करण्याचीही विनंती केली.
मात्र, कुठलीही दखल न घेता काम तसेच सुरू राहिल्याने ग्रामस्थांनी थेट शिरुर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता तलाठी गोविंद घोडके यांनी हे काम थांबवून सर्व २५० गुंठ्यांतील उत्खननाचा पंचनामा केला. दरम्यान, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशाने आज पंचनामा झाला असून पंचनामा शिरुर तहसीलदारांकडे जमा केला असल्याचे तलाठी घोडके यांनी सांगितले.