बापू मुळीक
सासवड : शिक्षकांचा तालुका तसेच अंजिर, डाळींब, सिताफळ आणि वाटाणा या शेतीउत्पादनाचा तालुका म्हणून पुरंदर तालुक्याची ओळख आहे. त्याप्रमाणेच सहकारी संस्थांमध्ये चांगले काम करणारा तालुका म्हणून पुरंदर तालुका ओळखला जाईल, असं काम करा, असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारी (दि. २९) पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गेली तीन वर्षातील ९० टक्के पेक्षा जास्त वसुली दिलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा, तसेच वाघापूर, गुळुंचे, टेकवडी येथील संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय जगताप बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा सहकारी उपनिबंधक प्रकाश जगताप उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी सोसायट्यांनी केवळ कर्ज वाटप आणि वसुली एवढेच न करता संस्था बळकट होण्यासाठी व्यवसायात उतरले पाहिजे. पुढील काळात प्रत्येक सोसायटीच्या माध्यमातून सेतू केंद्र सुरू केले जाणार असून कृषीशी संबंधित व्यवसाय, जेनरिक औषधे विक्रीचे दुकान, पेट्रोल पंप, भाजीपाला विक्री केंद्र, कॉमन फॅसिलिटी सेंटर, एटीएम, कृषी रोपवाटिका, ऑइल मिल, शेतकरी प्रशिक्षण, मिनी सुपर मार्केट आदी व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. यासाठी अनुदानही उपलब्ध केले जाणार आहे. जे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी असेल असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.
राजकारण बाजूला ठेवून सहकार पुढे कसा जाईल यासाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीनेच काम केले पाहिजे. चुकिवर टीका करतानाच चांगल्या कामाचे कौतुकही केले पाहिजे. स्वाहाकार बाजूला ठेवून निस्वार्थी पणे काम केले ज्याप्रमाणे पुरंदरची ओळख सहकार वाढवा… पाणी वापर संस्था उभारा…सहकार वाढविणे, टिकवणे अतिशय आवश्यक असून यामुळे शेतकरी, सर्वसामान्य सक्षम होईल. याबरोबरच शेतकरी सक्षमपणे उभा राहण्यासाठी आणि पाण्याच्या योजना सक्षम चालण्यासाठी प्रत्येक गावांत पाणी वापर संस्था उभ्या करण्याची गरज असून या संस्था उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आमदार संजय जगताप यांनी केले.
सुदामराव इंगळे यांनी केलेले बेलसर येथे नवीन शाखा सुरू करण्याची मागणीबाबत बोलताना डॉ दुर्गाडे म्हणाले कि, यापूर्वी सहज परवानगी मिळत होती. आता रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते आणि त्यासाठी पोर्टल उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे पोर्टल ओपन झाल्यावर लगेच शाखा सुरू करण्याची परवानगी घेण्यात येईल. नवीन २० ते २५ शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे असंही डॉ. दुर्गाडे यावेळी म्हणाले.