पुणे : आगामी जी -२०चे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाली असून ही समिट पुण्यात होणार असल्याने पुणे महानगरपालिकेने देखील पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. या जी-२० देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारा शनिवारवाड्यातील खास लेझर शो पालिकेच्या वतीने पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
कोरोना काळापूर्वी शनिवारवाडा येथे नियमित लेझर शोचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत होता. मात्र, कोरोना काळात हा शो बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र, आगामी पुढील वर्षाच्या सुरुवातीला जी -२० परिषदेचे आयोजनात येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींसाठी हा शो पुन्हा सुरु करण्यात आला असल्याचे पालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अधीक्षक श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.
ते बोलताना पुढे म्हणाले, जी-२० देशांचे प्रतिनिधी राज्य सरकारच्या निर्देशानुसार ऐतिहासिक, सांस्कृतिक तथा पर्यटन स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये अनके ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे असल्याने या ठिकाणांना या प्रतिनिधींकडून भेट देण्याची शक्यता आहे.
पुण्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती सांगणार हा शो इंग्रजी भाषेत देखील दाखविण्यात येणार आहे.