पुणे : मित्रासोबत बाणेर टेकडीवर फिरायला गेलेल्या परप्रांतीय महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. २८) सकाळी घडली. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे.
पीजेंदाई कामेई (वय १९, सध्या रा. आनंदनगर, जुनी सांगवी, मूळ रा. नागालँड) हा या हल्ल्यात जखमी झाला. कामेई आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरायला गेले होते. तेथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास कामेई आणि त्याच्या मित्राला चार लुटारूंनी अडवले. त्यांनी कामेई याला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने त्याच्या पायावर वार केला. त्यांनी कामेई याचा मोबाईल व इतर वस्तू त्याच्याकडील २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुबाडून नेला.
बाणेरबरोबरच पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवाट, तसेच सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर तरुणांना तसेच युगुलांना लुबाडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. मात्र, संकोचामुळे त्याबाबत अनेक जण तक्रार करत नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी याबाबत काटेकोर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या टेकड्यांवरील पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे.