भोर : आई रागवल्याने एका अल्पवयीन मुलाने जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानवली (ता. भोर) येथे उघडकीस आली आहे. आई रागवल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या मुलाने आत्महत्या का केली याचं कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेने परिसरात आणि शाळेत शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात धानवली गाव आहे. धनवले कुटुंब अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास आहे. अगोदरच्या दिवशी आई शाळेत का जात नाहीस म्हणून मुलाला रागावली होती. त्यादिवशी तो शाळेत गेला. मात्र, पहाटेच्या वेळी आईने उठून पाहिले तर तो त्याच्या अंथरुणात नसल्याचे तिला दिसून आले. तिने आजुबाजुला सगळीकडे पाहिले मात्र तो काही सापडला नाही.
आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने आई वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा काही नागरिकांना शाळेच्या एँगलला काही तरी लटकत असल्याचे आढळून आले. जवळ जाऊन पाहिले तर अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, अशा अवस्थेत पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास भोर पोलिसांकडून सुरू आहे.