मुंबई : जर्मनीच्या बाडेन वुर्टेम्बर्ग राज्याने आपली ‘लँड हिअर’ ही मोहीम महाराष्ट्रात सुरू केली आहे. महाराष्ट्र व बाडेन-वुर्टेम्बर्ग या दोन राज्यांतील गेल्या अनेक दशकांच्या सहकार्यावर आधारित ही मोहीम परस्परसंबंध भक्कम करेलच; परंतु जर्मनीतील कुशल कामगारांच्या वाढत्या गरजेचीही पूर्तता करेल.बाडेन-वुर्टेम्बर्ग आणि महाराष्ट्रातील संबंध दशकानुदशके भरभराटीला आले असून, त्यांची उभारणी परस्पर आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्यावर झाली आहे.
वर्ष १९६८ पासून बाडेन-वुर्टेम्बर्ग राज्याची राजधानी स्टुटगार्टने मुंबईसमवेत सिस्टर-सिटी पार्टनरशिप सहयोग राखला आहे. यंदा दोन्ही राज्यांनी कुशल कामगार भर्ती व व्यावसायिक प्रशिक्षण यात सहकार्याच्या हेतूने उचित स्थलांतर प्रथांबाबत परस्पर बांधीलकी ठळक करणाऱ्या एका संयुक्त जाहीरनाम्यावर सह्या केल्या. कामगार भर्ती प्रयत्नांना चालना देण्यासाठी पुण्यात एका सेवा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.