-योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले. जानेवारी 2024 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेचा निकाल 26 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर झाला. त्या परीक्षेत स्वप्निल वाळुंज याने राज्यात 68 वा क्रमांक मिळवत कुटुंबीय व गावचे नाव उज्वल केले आहे.
शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल वाळुंज याचे 1 ते 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिंदोडी येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण गुनाट येथील दत्त माध्यमिक विद्यालयात, उच्च माध्यमिक शिक्षण शिरुर येथील विद्याधाम प्रशाला आणि अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात झाले. स्वप्निल याला लहानपणापासुन वाचनाची व क्रिकेटची आवड असल्याने त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत याचा फायदा झाला.
शेतकरी कुटुंबातील स्वप्निल झाला अधिकारी…
शिरुर तालुक्यातील शिंदोडी गाव हे घोड धरणाच्या कडेला असणार बारमाही गाव. स्वप्निलचा जन्म वाळुंज या शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे चुलत आजोबा रंगनाथ वाळुंज हे सन 1985 साली शिंदोडी गावचे सरपंच होते. तर स्वप्निलचे सख्खे आजोबा पोपटराव वामन वाळुंज यांना भजनाची प्रचंड आवड होती. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अनेकवेळा त्यांच्या संगीत भजनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तर स्वप्निलचे दुसरे चुलत आजोबा ज्ञानदेव वाळुंज हे गावातील नामांकित हाडवैद्य होते.
स्वप्निलने केले दिवंगत आजोबांचे स्वप्न पुर्ण…
आपला नातु स्वप्निल याने लाल दिव्याच्या गाडीत बसुन यावे हे स्वप्निलचे आजोबा पोपटराव वाळुंज यांचे स्वप्न होते. परंतु डिसेंबर 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एक वर्षाने डिसेंबर 2023 मध्ये स्वप्निलने एकाच वेळी तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्याने सहायक आयुक्त, (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक अशा तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. पण हे यश पहायला मात्र आजोबा नव्हते याच शल्य आजही वाळुंज कुटुंबियांना आहे.
राज्यात प्रथमच शिंदोडी गावाचा डंका…
स्वप्निल वाळुंजच्या रुपाने शिंदोडी गावचे नाव प्रथमच महाराष्ट्र राज्यात झळकले. शेतकरी कुटुंबातील स्वप्निल याची आई गृहिणी तर वडील शेतकरी आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या स्वप्निलने सन 2019 पासुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी चालु केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे सन 2020 आणि सन 2021 या दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे 2022 मध्ये झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत स्वप्निलने सहायक आयुक्त, (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक या तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
माझ्या यशात कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक यांचा वाटा
माझ्या या सर्व यशात माझे कुटुंबीय,नातेवाईक,शिक्षक, मित्र परिवार आणि शिंदोडी गावचे ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा असल्याचे स्वप्निल वाळुंज याने माध्यमाशी बोलताना सांगितले. ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्यात निराशेचे क्षण आले. त्यावेळेस माझ्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती माझ्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे हे यश मी मिळवू शकलो.